अटळ पण अमान्य खेळ!

माणसाला चिरकाल जिवंत नि कुठल्याही भूतकाळात घेऊन जाणारं कोणी असेल तर आठवणी. शिंपल्यात जसा मोती अनादि अनंत असतो, तश्या आपल्या आठवणी आपल्या आयुष्यात असतात. पण यांचा दुर्गुण हा, की या कधीही म्हणजे अनपेक्षित घटकेलादेखील येऊन ठेपतात आणि मग मनाची घालमेल करतात. तेव्हा वाटतं, नको ते अनाठायी विचार करणं नि त्या काळात जाणंही! असंही, पुन्हा ते जगायला मिळतील, न मिळतील हे साशंकच असतं. अजून एक दुर्गुण म्हणजे, जितकं जास्त आपण ‘यांच्यात’ रमू, तितके जास्त भावनिक होत असतो. पुढे जाण्याच्या नादात एक असा ‘गतिरोधक’ आल्यामुळे, पुढे जाणं, नकोसं होतं, किंबहुना परत जुन्या लोकांमध्ये रमायला हवंहवंसं वाटतं. खरंतर, जुनं संबोधणे मला अनुचित वाटतं. आपल्या मनात ती माणसं आयुष्यभरासाठी रुजलेली असतात, मग जुनं म्हणून त्यांना कमी लेखणे, नको…

एखादी व्यक्ती, जिच्याशी आपला खूप जवळचा स्नेह आहे, अगदी रक्ताची नातीसुद्धा तीसमोर दुय्यमच, त्या व्यक्तीची नि आपली भौगोलिक अंतरे वाढली, तेव्हा मग सुरू होतो खरा अर्थ! नको असतं हे अंतर, पण परिस्थिती आणि आपल्या व्यावहारिक अडचणींमुळे ते येतंच, जे अटळ आहे. हे सगळं माहित असूनही मग का होतो एवढा त्रास? हाच गूढ प्रश्न आहे.

हे नातं आजीवन असतं आणि तेही माहित असतं, तरीही हे मानसिक खेळ सुरूच असतात.
देव आहे की नाही, या बाबतीत मी नेहमीच साशंक असतो, तरीही तो जिथे असेल तिथून त्याने हे ऐकावं, की माणसाला इतकही संवेदनशील नको बनवू की स्थिर होताना तो अस्थिर आणि अगतिक होईल. खूप मनातून आणि आकंठ असे हे माझेच बोल!

– शार्दुल

2 thoughts on “अटळ पण अमान्य खेळ!

Leave a comment