जीव स्वस्त आणि जगणं महाग!

मुंबई…जन्मभूमी, कर्मभूमी असणाऱ्यांना साहजिकच प्रिय असणारी, परंतु प्रत्येक महाराष्ट्रवासियाशीही एक नाळ जोडणारी ‘मायानगरी’. जिथे जगभरातून करोडो लोक त्यांची स्वप्नांची शिदोरी घेऊन येतात आणि ती पूर्ण करायला इथे अक्षरशः रक्ताचं पाणी एक करतात. इथे जगणाऱ्यांना कुणीही ‘अमुंबईकर’ सलाम करतोच, मग तो गौरवास्पद असेल किंवा उपहासात्मक! राष्ट्राची आर्थिक राजधानी आहेच, पण मराठी अस्मितेचं एक सामर्थ्य आहे ‘मुंबई’…

लोकलच्या गर्दीत आणि प्रवासात गुंतलेल्या प्रत्येक माणसाला त्याचं स्वप्न आणि ते जगायची उमेद इथे मिळते. वैयक्तिक आयुष्याचा अर्धत्याग केला, तरीही तो आनंदाने इथे मान्य असतो, कारण ती एव्हाना ‘माझी/आपली मुंबई’ झालेली असते. जागतिक, राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या नेहमीच सातत्याने सर्वांची नजर मुंबईवर असतेच, किंबहुना दहशतवादीसुद्धा इथेच त्यांचं बस्तान बांधायची दिवास्वप्नं पाहत असतात. अशी ही समृद्ध मुंबई, दिवसागणिक अधिक धोकादायक आणि सामान्यांना दरीत ढकलणारी होत चाललीये का? हा गहन प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. याला कारण, शासन आणि प्रशासन दोघांची चाललेली अनागोंदी. कित्येकवेळा सामान्य आणि निर्दोष नागरिकांना हे प्रशासन गृहीत धरतंय, असंच आता दिसू लागलंय. मग असं म्हणायचं का?, जिथे मरण स्वस्त आणि जगणं महाग, ती ‘मुंबई’!

कुठलाही पक्ष असो किंवा एकटा नेता, सर्वच मुंबईवर जीव लावतात. मग जेव्हा, आज ही दुर्घटना घडते, तेव्हा इथच्याच मोठ्या नेत्यांना, मुंबईपेक्षा निवडणुकीच्या सभा जास्त महत्वाच्या वाटतात. नेमका हा पूल कोणाचा, यातच दोन प्रशासनांचा वादंग होत असेल, तर कसला समन्वय राखतायत, हे महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन? ज्या शासनव्यवस्थेचा लोक आदर करतात आणि निर्धास्तपणे विश्वास ठेवतात त्यांनीच यांचे जीव असे वेठीला बांधून ठेवल्यास, कुठलं का सरकार असेना, कोणाला अन किती किती दोषी ठरवायचे. एवढं होऊनही, इथले काही थोर नेते २४ तासांनंतरही भेटत नाहीत, म्हणजे त्या बळी ठरलेल्यांचं दुर्दैवच की! अमुंबईकर सुद्धा आक्रमक होण्यापर्यंत या घटना घडतच आहेत.

न्यूज चॅनेल्स दाखवत होते, तो प्रश्न खरंच भेडसावतोय. ‘आता असं झालंय का, की प्रत्येक क्षणाला मुंबईतल्या माणसाने घरी फोन करून सांगावं की, मी जिवंत आहे.’ ३० वर्षांपूर्वी बांधलेला पूल कोसळावा आणि त्याच्याच शेजारी २०० वर्षांपूर्वी बांधलेली इमारत सबळ उभी, हे प्रश्नचिन्ह न संपणारं म्हणावं लागेल! ५ लाख रुपयात कुठला मुंबईकर आयुष्यभर जगतो, ते हे दातेच जाणो! मृत्यूचे अनिश्चित सापळे इथे वारंवार रचलेले आहेत आणि ते मान्य असतील तरच इथे राहावं का? एकीकडे देशभरातून लोक ध्येय गाठायला येतात आणि दुसरीकडे त्यांना जीवानिशी खेळावं लागतंय, तेही दररोज. निवडणुकीच्या मोहापायी तरी ही व्यवस्था जागी होवो, हीच अपेक्षा.

कितीतरी मुद्दे कोडं बनून सातत्याने या महानगरात सतावतायत आणि मुंबईकर पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच व्यूहचक्रात जगतोय, फिरतोय आणि हतबलतेने शासनव्यवस्थेवर विश्वास ठेवून संघर्षाचे टप्पे पार करतोय…
मुंबईत वास्तव्य नसलेल्यांनाही लळा लावणारं हे एकमेव महानगर!

– शार्दुल
१५ मार्च २०१९

mumbai-173

 

2 thoughts on “जीव स्वस्त आणि जगणं महाग!

  1. शार्दूल बाळा, अत्यंत संवेदनशीलपणे आणि पोटतिडकीने विषय मांडलायस .. वाचून खूप बरं वाटलं .. keep it up .. नियतीच्या नावावर सत्तेचा सामान्यांचा जीवाशी चाललेला क्रूर खेळ चाललेला बघतांना या अगदिकतेलाच मुंबईकरांचे स्पिरिट म्हणायचे की जन सामान्यांनी स्वीकारलेली दमन यंत्रणा पाहून पोटात तुटल्याशिवाय राहत नाही, पण हृदयशून्य सत्ताधाऱ्यांना हे जाणीवपूर्वक समजूनच घ्यायचे नाहीये. असो, ही खेद आणि खंत अशा निमित्ताने व्यक्त करत राहण्याचं संवेदनशील कर्तव्य मात्र पार पाडणं आपण सोडायचं नाही .. या निमित्ताने इतकंच …

    Liked by 1 person

    1. असं व्यक्त आणि आक्रमक होणे, याचं गांभीर्य व्यवस्थेला समजावं, हीच अपेक्षा आहे.सर, तुमच्याकडून खूप शिकायला मिळत असतं, त्यातून हा छोटा प्रयत्न!

      Like

Leave a comment