मुंबईस पत्र…

प्रिय मुंबई,
तू लाखोंचं स्वप्न आहेस, तू लाखोंचा आत्मविश्वास आहेस आणि लाखोंची जगण्याची शिदोरीही आहेस. जगाच्या कानाकोपऱ्यांतून माणूस इथे येतो, कारण त्याला माहितीये, इथे प्रत्येकाच्या स्वप्नांना पाठबळ मिळतं, कामाचं आणि पैशाचंसुद्धा… कामातून पैसा येतो आणि पैशातून नवीन स्वप्नं, नवीन आशा बांधण्याची उमेद येते. यामुळेच तू अनेकांची प्रेरणास्रोत आहेस. तुझा इतका दरारा आहे, की इथे स्वतःच्या मालकीचं घर घेण्यालासुद्धा ऐपत लागते, आणि तशी ‘औकात’ बनवावी लागते. शिक्षण, नोकरी ते घरदार असा सगळा प्रवास तुझ्या साक्षीने घडतो आणि त्याचा एकमेव सन्मान तुलाच जातो.

तमाम महाराष्ट्र काय किंवा अखंड भारत काय, तुझ्याकडे धाव घ्यायला तडफडत असतो आणि जिद्दीने मुंबई काबीज करतो. पण खरा प्रवास तर पुढे असतो, जो की अत्यंत खडतर मानला जातो. माझ्यासारख्या कित्येक छोट्या शहरांमधून आलेल्या मुलांना मुंबईकर असलेल्या मुलांचा, लोकांचा हेवा वाटतो आणि आपण काळाच्या ओघात मागे पडत होतो, याची खंत वाटते; पण इथे आल्यामुळे उमेदही मिळते आणि ऊर्जाही. तू जिवंत असतीस ना, तर तुला नोबेल नक्कीच मिळाला असता, केव्हाच…! हां, तोही तुझ्याकरता कमीच असला असता, कारण त्याहूनही कैकपटीने मोठा तुझा गौरव होणे अपेक्षित आहे.

तू अनंत लोकांचं प्रेम कमावलंयस, ईर्षा झाली आहेस आणि तू हव्यास आहेस गं! याउपरही, आम्हा महाराष्ट्रीयांना एक वेगळाच अभिमान आहे, तू आमची जननी असल्याचा! (तुझ्याकडे यायला कितीही घाबरत असलो, तरीही हेच खरंय). तुझ्यात २४ तासांपेक्षाही अधिक काम करण्याची क्षमता आहे, असं एक वेळेचं आणि काळाचं चक्र तू घालून फिरत आहेस आणि ते चक्र इथली २ कोटी जनता अनुक्रमत आहे. लोकल, मेट्रो आणि बेस्टच्या वेळा तू कधीच चुकवत नाहीस, अगदी नेमाने त्या पाळतेस आणि त्यावर चालायला मुंबईकरांना व आयात झालेल्या लोकांना भाग पाडतेस. खरंच, ही शिस्त, वक्तशीरपणा तुझ्याखेरीज दुसरं कोणी शिकवत असेल, असं मलातरी वाटत नाही.

एवढं महान कार्य चोखपणे बजावत असतानासुद्धा अख्खी दुनिया तुझ्यावरच का टपून बसलीये? का तुझं वाईट करू पाहतेय? बरं माणसं निष्ठुर झालीयेत, मग त्यापाठोपाठ निसर्गही तसाच वागू पाहतोय का? अशी कुठली पापं केलीयेत मुंबई आणि मुंबईकरांनी, की सगळी संकटं अगदी दत्त म्हणून उभी असतात त्यांच्या समोर? जगात कुठे काहीही होवो, त्याची ठिणगी मुंबईत उडणार म्हणजे उडणारच! त्सुनामी असो, २६/११ असो, एल्फिन्स्टन पूल असो किंवा मग सीएसटी चा पूल असो… आता अखंड जगासमोर महासंकट उभं टाकलंय ‘कोरोना’चं. त्यालातरी तू(मुंबई) कशी अपवाद ठरणार?! आधी वुहान, मग इटली, इराण, फ्रान्स अन् आता भारत… अख्ख्या देशात हाहाकार माजवत असताना एक मोठं आव्हान आहे ते मुंबईचंच! कारण, इथे कुठल्याही शहरापेक्षा जास्त संभाव्यता आहे COVID-19 चे संशयित असण्याची. लोकल मधून धावणारी लाखो जनता, दिवसभर दगदग करणारे कर्मचारी, नोकर, कामगार, विद्यार्थी आणि अनेक क्षेत्रातली लोकं! तुझ्या आत वास्तव्य असलेल्या लोकांचे प्राण मुठीत आहेत आणि तुझा जीव मात्र ‘व्हेंटिलेटर’वर! सुट्ट्या मिळाल्या की लगेच माझ्यासारखे विद्यार्थी घरी धावून आले, पण जे तुझ्या कुशीत आहेत, तुझासोबत श्वास घेतात आणि तुझ्यामुळेच सुखरूपही आहेत, त्यांचे जीव मात्र आज किती घालमेल करत असावेत! हा एकच विचार आला आणि तुला बोलतं करायला लिहितोय, पण तू मात्र तशीच आहेस… तुझ्या सहनशीलतेचा अंतच नाहीये, इतकी कठोर आणि स्थितप्रज्ञ तू आहेस! पण, स्वतःला जप आणि पुन्हा एकदा या अकाली संकटावर आपण सगळे मात करूया…

तुझाच,
– शार्दुल
१९ मार्च २०२०

2 thoughts on “मुंबईस पत्र…

Leave a comment