बघ काही फरक वाटतोय का…

जरा एकटं राहून पहा,
तुलाच तू नव्याने पारख,
तुझ्या स्वतःशी ओळख कर,
बघ काही फरक वाटतोय का…

तुझ्याच पोकळ मनाला बोल,
तुझेच शब्द नव्याने गुंतव,
नवे अर्थ शोध आणि न्याहाळ,
बघ काही फरक वाटतोय का…

कोणी अबोल झालं तर शांत राहा,
कोणी मित वाटलं की धीर धर,
इथेच दिसेल तुला अंतर माणसांतले,
बघ काही फरक वाटतोय का…

अल्लड बनव स्वतःला आता,
कशाला हवाय सारखा मोठेपणा?
ओसरत्या नात्यांमध्ये गोडवा पहा,
बघ काही फरक वाटतोय का…

नको बाळगू ओझे अपेक्षांचे,
गाठी ओल्या होतील आणि तेवढ्याच राकट,
सैल सोड तुझ्या बंधनांना आता,
बघ काही फरक वाटतोय का…

तुही थोडे कणखर बन की,
कोणी तुला पाश लावलेत?
फसू दे पण प्रयत्न करत राहा,
बघ काही फरक वाटतोय का…

– शार्दुल
२६ मार्च २०२०

2 thoughts on “बघ काही फरक वाटतोय का…

Leave a comment