त्यात तू नाहीस…

गर्द रान आहे, गर्क सृष्टी आहे, फक्त तू नाहीस…
आहेत इथे वन्यपशु, हिरवाईही आहे, त्यात तू नाहीस…

झिरपतो प्रकाश अल्लद, समीरही बहरतो, मात्र तू नाहीस…
हलकेच पसरता हस्त तरूंनी, सावलीही व्याकुळ होते, त्यात तू नाहीस…

घन अंधार करता, चांदवा जरा भासतो, तिथे तूच नाहीस…
शुभ्र कवडसे सांडता रानांत, त्यात तू नाहीस…

तप्त नाही कोणी, लुप्तही काही नाही, तरीही तू नाहीस…
एवढे नाद करता, भावनिक गलका होई, त्यात तू नाहीस…

काळोख दाटला आता, नभ शशांक कवेत घेता, फक्त तू नाहीस…
चालता ही अंधारवाट, विरह तुझा झेलतो, अशात तू नाहीस…

शोधतो मी हजार कंदरा, तुझ्या अस्तिवाकरता, तिथेही तू नाहीस…
विलक्षण असल्या घटना, देहही आश्वस्त, त्यात तू नाहीस…

जगतो आहे आठवांत, तव साथीच्या संमोहात, तरीही तू नाहीस…
न थकलो न हरलो, तुझे भास स्मरतो, अजूनही तू नाहीस…

– शार्दुल
२८ मे २०२०

4 thoughts on “त्यात तू नाहीस…

Leave a comment