बघ एकदा आभाळाकडे निरखून…

Photo Credit : Deepak Achhra (Instagram – @illusion.artist)

बघ एकदा आभाळाकडे निरखून…,
ते शांत आहे, स्थिर आहे आणि विहंगमसुद्धा…
बघ एकदा त्या आभाळाच्या छटा…,
कापूस पुंजका जरी विखुरला आहे, ते अजून आहे शुभ्रसुद्धा…
बघ एकदा आभाळवरची नक्षी…,
कधी पशूजनाचे रूप, कधी ईश्वराचे स्वरूप, भेदहीनसुद्धा…
बघ एकदा त्या आभाळवरच्या भेगा…,
त्याला रुक्ष न करता विखुरतात, असा तो सहिष्णसुद्धा…
बघ एकदा त्या आभाळाचे सामर्थ्य…,
तळपत्या प्रखर चटक्यांचा वाली, निरवसुद्धा…
बघ एकदा त्या आभाळाचा मोह…,
क्षणार्धात दिसेनासा होऊनही परततो, आपल्या प्रेमासाठीसुद्धा…
बघ एकदा त्या आभाळाची उमेद…,
पहाट, उन्हे नि संधिकाल, एवढेही अपुरे तर रात्रीसुद्धा…
बघ एकदा त्या आभाळाची जीवापाड माया…,
भयंकर काळोखातही चंद्राला कुशीत घेऊन राखतो नातंसुद्धा…
बघ एकदा आभाळाची निःस्वार्थ काया…,
वरूणराजालाही त्याच्या ओंजळीतून ओततो आणि गारवासुद्धा…
बघ एकदा त्या आभाळाचे दृश्य…,
नीलांबराच्या छत्राखाली त्याच्या कुशीत न जाताही, तिथे नांदतोसुद्धा…

– शार्दुल
१९ जून २०२०

2 thoughts on “बघ एकदा आभाळाकडे निरखून…

Leave a comment