सुजलाम् सुफलाम् राष्ट्र इथले…

सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम् ।
सस्य शामलाम् मातरम् ।।
यावर्षीचा स्वातंत्र्यदिन ७३ वर्षे पूर्ण होऊन ७४व्या वर्षात पदार्पण झाल्याचे प्रतीक आणि शुभ औचित्य. इंग्रज सरकार संपुष्टात आले, भारतीय तिरंगा फडकत असताना आपल्या अस्तित्वाचा एक नवा अध्याय १५ ऑगस्ट १९४७ रोजी सुरू झाला. परंतु संघर्ष अजून संपला नव्हता आणि भारत सर्वार्थाने स्वतंत्र व्हायचा बाकीच होता. इंग्रज गेले, पण जाता जाता वादळापूर्वीची शांतता सोडून आणि नव्या रणांगणाचा सुरुंग लावून… कारण, जेव्हा भारतदेश स्वतंत्रतेचे दिवे उजळवत होता, तेव्हा ५६५ अशी संस्थाने होती, जिथे अजूनही हुकूमशाहीचा खेळ सुरूच होता. या भागांतली, प्रांतांतली जनता अजूनही पारतंत्र्याशी झगडत होती आणि गुलामीच्या खसता खात होती.


मी मराठवाड्यातील नागरिक असल्या कारणाने आमच्यासाठी ‘खरा’ स्वातंत्र्यदिन हा १७ सप्टेंबर यादिवशीच असतो. त्यादिवशीचे वातावरण स्वातंत्र्यदिनापेक्षा तिळमात्रही कमी नसते. ह्या ५६५ संस्थानांपैकी हैदराबाद हे एक संस्थान होते, ज्यात पाच मराठी भाषिक जिल्हे, तीन कानडी भाषिक जिल्हे, तर नऊ तेलुगू भाषिक जिल्हे समाविष्ट होते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, स्वातंत्र्यवीर सावरकर, हे आणि अशा कैक स्वातंत्र्यसैनिकांनी रणभूमीवर झुंज दिली, म्हणून आपली मातृभूमी आजच्या दिवशी सृजन झाली. त्यानंतरच्या नव्या पर्वात सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनी पुढाकार घेत, परिश्रम आणि त्यागांची आहुती दिली आणि अखेर १७ सप्टेंबर १९४८ ला हैदराबाद संस्थान भारत राष्ट्रात विलीन झाले. तत्पूर्वी बाकीची संस्थाने यशस्वीरित्या स्वतंत्र देशाचा उंबरठा ओलांडून स्वदेशाच्या अधीन झाले आणि लोकांनी मोकळा श्वास घेतला.


ह्या सगळ्या कालचक्रात घटना इतिहासजमा झाल्या आणि येणारी पिढी नवी आव्हाने झेलत, सामोरं जात पुन्हा त्यातूनही यश आत्मसात करत होती. समाजकारण आणि राजकारण एकमेकांचा समतोल राखत अजूनही देशाला ‘विकसनशील’ याच मथळ्याखाली स्थान देत आहे. एकेकाळी सोन्याचा धूर आणि दुधाच्या गंगा वाहत नेणारा देश, हळूहळू नवे प्रश्न, त्यांची उत्तरं आणि अफाट असे बदल आपल्याला दाखवत आहे. यातून शिकणे, अनुभव घेणे आणि पुन्हा वेगळी जीवनशैली उरात बाळगून आपण जगतोय. हे कितीही विक्षिप्त किंवा असमंजसपणाचे बोल वाटत असावेत, पण वास्तव हेच आहे.


बलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद, घोटाळे, भ्रष्टाचार आणि अनेक नकारात्मक घटना सर्रास घडतात आणि त्यांविषयी बोलणे, वाचणे अगदीच क्षुल्लक झाले आहे. मग यात चूक कोण, भोगतंय कोण, हा विचार करायला सामान्य माणूस फार कमी वेळ काढतो, अर्थात माझी गणती त्यांतच होते. गेल्या कित्येक दिवसांपासून, विशेषतः गेल्या चार महिन्यांपासून अनेक प्रसंग, घटना आणि अनुभव आपण पाहतोय. अनेकजण बेघर झालेयत, पोटाची खळगी रिकामी आहे आणि एकवेळच्या खाण्याची सोय नाहीये. वेदना, दुःख, भीती आणि काळजी या सगळ्यांचा उद्रेक होतोय आणि नको ते घडतंय, या अतिकठीण काळातसुद्धा… स्वतंत्र भारत कुठेतरी खचलाय, हरवलाय आणि त्यातलाच काही भाग, ज्यांचं सगळं अलबेल, खुशाल आणि समाधानी आयुष्य चालू आहे. ही एवढी तफावत भयंकर आहे आणि यशाचं द्योतक तर मुळीच नाहीये. मला एवढंच सांगायचं आहे, आपण ज्या मानसिक विचारांना घेऊन जातोय, की शासन-प्रशासन चोख जबाबदारीने काम करत आहे, मग आपला सहभाग का हवा?! आपण सर्वच गोष्टींत हतबलता न दर्शवता जिथे आहोत, तिथूनच कणभर ही मदत करूच शकतो, फक्त आपली मानसिकता, दृष्टिकोन किंचित बदलून पाहावा, एवढेच…


२०२० चा स्वातंत्र्यदिन म्हणजे अगदीच ‘न भूतो, न भविष्यति’ असा असावा. दरवर्षी आजच्या दिवशीचा आनंद, उत्साह आणि ध्वजारोहणात सामील होऊन अभिमान मिरवणं, यावर्षी मात्र काहीतरी हुरहूर आहेच. पण त्यांतही आपले उद्या आणि आयुष्यभराचे अनेक सोहळे निर्धास्तपणे पार पडावेत, याची काळजी आहे. उगाच नाराज होऊन किंवा सध्याच्या वर्षाला नावं ठेवून काही साध्य होणारच नाहीये आणि एका क्षणात हे वर्ष सरणारही नाहीये. सर्व नियमांचा आणि मुख्यत्वे आपल्या आरोग्याचा आदर करून चोऱ्याहत्तराव्या पर्वात वाटचाल करू… विराट सागराएवढ्या शुभेच्छा!

– शार्दुल
१५ ऑगस्ट २०२०

3 thoughts on “सुजलाम् सुफलाम् राष्ट्र इथले…

Leave a comment